सोनीपत -केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेले कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी मागील २१ दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, बाबा राम सिंह हे करनालमधील सिंगडा गावाचे रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचेही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
बुधवारी सायंकाळच्या वेळेस संत रामसिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी लागल्यानंतर संत बाबा राम सिंह यांना पानिपतमधील पार्क रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सोनीपत पोलिसांना संत बाबा राम सिह यांच्याजवळील सुसाईट नोट मिळाली आहे.
काय आहे संत बाबा राम सिंह यांच्या सुसाईड नोटमध्ये
शेतकऱ्याचे दु:ख पाहिलं. जे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर बसले आहेत. हे पाहून मन खिन्न झालं. सरकार न्याय देत नाहीये. अन्याय करत आहे. अन्याय करणे पाप आहे आणि ते सहन करणे देखील पाप आहे. शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी अनेकांनी आपले पुरस्कार परत करत आपला राग व्यक्त केला. मी शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि सरकारकडून करण्यात येत असलेल्या अन्यायाविरोधात आत्महत्या करत आहे. हा अन्यायाविरोधातील आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा एक आवाज आहे. वाहे गुरूजी की खालसा. वाहे गुरूजी की फतेह.