मुंबई -उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमधील एका मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने कारवाई केली त्याप्रमाणे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील कायदेशीर कारवाई करतील आणि दोषींना कडक शिक्षा देतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी या घटनेला कोणीही धार्मिक रंग देवू नये म्हणत भाजपला टोला लगावला. ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा करत साधूंच्या हत्येबाबत चिंता व्यक्त केली.
बुलंदशहर हत्या प्रकरण : महाराष्ट्राप्रमाणे उत्तरप्रदेश सरकार देखील कायदेशीर कारवाई करेल - मुख्यमंत्री ठाकरे - बुलंदशहरमधील घटना अत्यंत निघृण आणि अमानुष
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरातील मंदिरात दोन संत-साधुंची हत्या झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. तसेच या घटनेबाबत चिंता व्यक्त केली.
![बुलंदशहर हत्या प्रकरण : महाराष्ट्राप्रमाणे उत्तरप्रदेश सरकार देखील कायदेशीर कारवाई करेल - मुख्यमंत्री ठाकरे sanjay rawut on two saints murdered case two saints murdered case bulandshahr up बुलंदशहरमधील घटना अत्यंत निघृण आणि अमानुष बुलंद शहरातील मंदिरात दोन संत-साधुंची हत्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6973352-322-6973352-1588068063814.jpg)
पालघर जिल्ह्यातल्या गडचिंचले गावात लॉकडाऊनच्या काळात एक जमावाने तिघांची मारझोड करून हत्या केल्याचे प्रकरण ताजे आहे. या हल्ल्यात दोन साधूंची हत्या झाली होती. समाज माध्यमावर अनेकांनी निषेध केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा ट्रेंड ही समाज माध्यमावर चालला होता. यात भाजपचे नेते आघाडीवर होते. तसेच देशभरातून भाजपच्या नेत्यांनी ठाकरे यांच्यावर टीकाही केली होती. देश एकीकडे कोरोनाच्या विळख्यात असताना अनेकांना राजकारण सुचत असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी टिकेला उत्तर देताना म्हटले होते. आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून कुणीही राजकारण करू नये. देश कोरोनाशी लढत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हल्लेखोरांवर योग्य कारवाई करतील, असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
पालघर येथील घटनेत दोन साधूंची हत्या झाल्यानंतर या घटनेला भाजप जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका सेनेसोबत सत्ताधारी काँग्रेसनेही केली होती. पालघरच्या घटनेवरून राजधानी दिल्लीतही भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही साधूंच्या हत्येबद्दल सरकारला खडे बोल सुनावले असते, असे वक्तव्य देखील भाजपच्या नेत्यांनी केला होते. आता भाजपचीच सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशात एका मंदिरात साधूंच्या हत्येची घटना घडली असून यावर भाजप काय भूमिका घेणार? असा सवाल ही सेनेच्या नेत्यांनी केला आहे.