नवी दिल्ली -काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात होणाऱ्या आघाडीच्या आड सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता हा शब्द येत आहे का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारल्यानंतर त्यांनी सेक्युलर शब्दाबाबत शिवसेनेला आक्षेप असण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीत येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी आपली ही भुमिका स्पष्ट केली.
हेही वाचा... 'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल'
मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जवळीक साधत आहे. मात्र कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा केली असता, संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 'सेक्युलर हा शब्द भारताच्या राज्यघटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कोणाचेही काम करताना, त्याची जात अथवा धर्म पाहिला जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.