लखनौ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्या (शनिवार) अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या तयारीची पाहणी करण्यासाठी, शिवसेना खासदार संजय राऊत हे आज अयोध्येमध्ये हजर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्यामध्ये जाणार आहेत. शनिवारी दुपारी २ वाजता उद्धव ठाकरे हे लखनौला पोहोचतील. त्यानंतर, संध्याकाळी ४.३० च्या सुमारास ते पालीमध्ये रामलल्लांचे दर्शन घेतील. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, आणि आदित्य ठाकरेही उपस्थित असतील.
'रामलला सर्वांचेच; राहुल गांधी, ओवैसी अन् ममतांनीही दर्शन घ्यावे..' 'कोरोना'मुळे सरयू आरती होणार नाही..
उद्धव ठाकरेंच्या सरयू आरतीबाबत विचारले असता राऊत म्हणाले, की कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान, गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाकडून सूचनापत्र जारी करण्यात आले आहे. तसेच, आपणही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. सध्या तरी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होईल असे काहीही उद्धव ठाकरे करणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःच सरयू आरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावे..
अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करायला हवे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी, तसेच ओवैसी आणि ममता बॅनर्जींसह इतर नेत्यांनीही सहकार्य करावे. तसेच बॅनर्जी यांनी अयोध्येमध्ये येऊन रामलल्लाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही राऊत यांनी केले.
हेही वाचा :'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार'