मुंबई - बलात्काराच्या वक्तव्यावरून माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, या राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधींवर चांगलीच टीका केली गेली. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेससोबत युती केल्याने शिवसेना राहुल गांधींच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वीर सावरकरांचा अपमान करू नका, येथे तडजोड नाही, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना हेही वाचा -भाजप नेते संबित पात्रांनी राहुल गांधींचं ठेवलं नवं नाव, म्हणाले...
वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाची आहुती दिली. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. येथे तडजोड नाही. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो. तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करू नका. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, असे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
यामधून शिवसेनेला राहुल गांधीचे वक्तव्य रूचले नसल्याचे दिसून येत आहे. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर तडजोड करणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील भाजप अशा परिस्थितीचा फायदा घेऊन शिवसेनेला डिवचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कदाचित त्यामुळेच संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा -मी माझ्या वक्तव्यावर ठाम, माफी मागणार नाही - राहुल गांधी
वैचारिक मतभेद असतानाही भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ३ पक्षांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असल्याने सावरकरांवर राहुल गांधींनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच लागल्याचे दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकार चालवताना वैचारिक मतभेद असतानाही एकत्र राहत तिन्ही पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये काही बिघाडी तर येणार नाही ना?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'मला संसदेत भाजपच्या लोकांनी माफी मागायला सांगितली. मात्र, मी मुळीच माफी मागणार नाही. एकवेळ मरण पत्करेन पण कोणाचीही माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही,' असे म्हणत राहुल गांधींनी महिला अत्याचारावरील वक्तव्यासाठी माफी मागणार नसल्याचे सांगितले. 'खरे तर नरेंद्र मोदींनी माफी मागितली पाहिजे. त्यांचे 'असिस्टंट' अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे,' असे ते पुढे म्हणाले होते. रामलीला मैदानावर भारत बचाओ रॅलीमध्ये राहुल गांधींनी हे वक्तव्य केले होते.
हेही वाचा -रामलीला मैदानावर आज काँग्रेसची ‘भारत बचाओ रॅली’