नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये विजयादशमीला राफेल लढाऊ विमानाचे पूजन केल्यानंतर त्यांच्यावर आणि भाजपवर विरोधकांनी मोठ्या प्रमाणात टीका केली. माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी 'अशा प्रकारचा तमाशा करण्याची गरज नव्हती,' अशा शब्दांत संभावना केली. मात्र, त्यानंतर खरगेंना स्वपक्षातूनच टीकेचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसच्याच संजय निरुपम यांनी 'तुम्ही 'नास्तिक' असाल आम्ही नाही. तुम्हाला परंपरा काय आहेत, ते समजत नसेल. पण आम्हाला समजते,' असे म्हणत खरगेंना घरचा आहेर दिला आहे.
'शस्त्रपूजेला 'तमाशा' म्हणणे योग्य नाही. भारतामध्ये 'शस्त्रपूजे'ची खूप जुनी परंपरा आहे. मात्र, खरगेजी नास्तिक आहेत, ही अडचण आहे. मात्र, काँग्रेस पक्षात सर्वच जण नास्तिक आहेत असे नाही,' असे निरुपम यांनी म्हटले आहे. 'आपल्या संपूर्ण देशातील लोकसंख्येपैकी केवळ एक टक्का लोक नास्तिक असतील. मात्र, नास्तिकांची मते आस्तिक असणाऱ्यांवर किंवा देवाला मानणाऱ्या आणि श्रद्धा असणाऱ्यांवर लादता येणार नाहीत. किमान त्यांनी (खरगेंनी) ही मते काँग्रेसवर लादू नयेत. त्यांनी जे बोलले, ते त्यांचे वैयक्तिक मत होते. ते पक्षाचे मत नाही,' असे निरुपम यांनी म्हटले आहे.