नवी दिल्ली -भाजप आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने घरच्यांच्या विरोधात जाऊन दलित मुलासोबत विवाह केला आहे. यानंतर, साक्षी घर सोडून पळून गेली आहे. या घटनेनंतर साक्षीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये साक्षीने पोलिसांनी आवाहन करताना म्हटले आहे, की माझ्या वडिलांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आम्हाल सुरक्षा देण्यात यावी.
बरेली जिल्ह्यातील बिथरी चैनपूर येथून आमदार असलेले राजेश मिश्रा उर्फ पप्पू भरतौल यांची मुलगी साक्षीने दलित युवक अजितेश कुमार याच्यासोबत हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला होता. या विवाहाचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल करण्यात आला होता. यानंतर, अजून एक व्हिडिओ पोस्ट करताना साक्षीने वडील राजेश मिश्रा, भाऊ विक्की आणि एका सहकाऱ्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. हे सर्वजण मिळून माझी आणि माझ्या पतीची हत्या करू पाहत आहेत. यामुळे मला आणि माझ्या पतीला पोलिसांनी सुरक्षा द्यावी. यासोबतच बरेलीतील खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी माझ्या वडिलांना मदत करू नये, असे आवाहन तिने केले होते.
तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. आमच्या दोघांचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या परिवाराला त्रास देऊ नका. त्यांचा काही दोष नाही. हा निर्णय माझा आहे. मला स्वतंत्र आणि मुक्तपणे जगायचे आहे. प्लीज हे सर्व बंद करा, असेही साक्षीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.