बांगरमऊ - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी आता नवीन वाद ओढावून घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील बांगरमऊ येथील पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार श्रीकांत कटियार यांच्या प्रचार करण्यासाठी साक्षी महाराज येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, की स्मशान भूमी ही जातीच्या लोकसंख्येवर आरक्षित असली पाहिजे.
२ नोव्हेंबरला बांगरमऊ मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडणार आहे. येथील आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. या दरम्यान भाजपचे उमेदवार श्रीकांत कटियार यांच्या प्रचारासाठी साक्षी महाराज यांनी कॉर्नर सभा घेतली. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.