मुंबई - सरकारविरोधात मोर्चा आणि आंदोलन करणाऱ्यांशी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केली होती. महाजनांवर विश्वास ठेवणे सकल मराठा क्रांती महामोर्चाला महाग पडले आहे. आम्ही महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली, असे सकल मराठा क्रांती महामोर्चाने म्हटले आहे.
आम्हाला विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आम्ही २२ फेब्रुवारीला उपोषणाला आझाद मैदान येथे बसणार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले; पण त्याचा कोणताही फायदा समाजाला मिळत नाही. आम्ही ३ महिन्यांपूर्वी १६ दिवसाचे उपोषण केले होते. आमच्या काही मागण्या सरकार दरबारी दिल्या होत्या. या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन मध्यस्थी करणारे गिरीश महाजन यांनी दिले होते. परंतु, अजूनही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. महाजन यांच्यावर विश्वास ठेवून चूक केली. म्हणून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. अन्न आणि पाण्याचा त्याग करणार आहोत, असे क्रांती मोर्चाचे संजय घागे यांनी सांगितले.