जयपूर -राजस्थानमध्ये राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहे. एकीकडे म्हटले जात होते की रात्री होणाऱ्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये सर्व ऑल इज वेल होईल, मात्र तसं काहीही होताना दिसत नाही. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजने सचिन पायलट वेगळा मार्ग चोखाळत असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप पायलट यांच्याकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
सचिन पायलट नियमीत वापरत असलेल्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा मेसेज आहे. त्यात म्हटले आहे की, असे असेल तर अशोक गहलोत सरकार अल्पमतात आहे. त्यांना विधीमंडळ पक्षाची बैठक घेण्याचा अधिकार नाही. पायलट यांच्याकडून हा मेसेज असेल आणि तो अधिकृत मानला गेला तर त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे.
वास्तविक पायलट यांच्याकडून याबाबतचे अधिकृत वक्तव्य जारी झालेले नाही. पायलट नियमीत वापरत असलेल्या या व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेजने काँग्रेसच्या संकटात मात्र वाढ केली आहे. राजस्थानमधील हे राजकीय वारे येणाऱ्या काळात अधिक वेगाने वाहाण्याचेच संकेत मिळत आहेत.
राजस्थानातील अशोक गेहलोत सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याचे प्रकरण राज्यात चांगलेच गाजत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी रात्री उशीरा आपल्या निवासस्थानी सर्व मंत्र्याची बैठक घेतली होती. सुमारे 2 तास चाललेल्या या बैठकीत राजस्थान सरकारचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट उपस्थित नव्हते. बैठकीच्या माध्यमातून अशोक गहलोत यांनी सरकारवर आपली पकड दाखवायचा प्रयत्न केला. परंतु, सचिन पायलट यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा :राजस्थानचे राजकारण : काँग्रेसच्या भविष्याची चिंता वाटते; कपिल सिब्बलांचे ट्विट