नवी दिल्ली - 'भारत अमेरिकेने प्रतिबंध लादलेल्या रशियासह सर्व देशांशी राष्ट्रहितासाठी आवश्यक संबंध ठेवणार आहे,' असे भारताने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे. भारत रशियाकडून एस-४०० ही क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष माईक पॉम्पियो यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ही बाब स्पष्ट केली.
सध्या अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. यावेळी पॉम्पियो यांनी ट्रेड वॉर आणि एस-४०० वरही भाष्य केले.
'भारत हा अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण भागीदार-मित्रदेश आहे. या संबंधांना नवीन आयाम प्राप्त होत आहेत. आम्हाला जोडीदार मिळाले नाहीत आणि आम्ही एकत्र काम केले नाही असे, कधीही झाले नाही. देशांना स्वत:ची सुरक्षा करता यावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतानेही असेच प्रयत्न करावेत, अशी आमची अपेक्षा आहे, असे मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. तसेच या दोन्ही मुद्द्यांना संधीच्या रूपात आम्ही पाहतो. तसेच आम्ही एकत्र काम करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करू शकतो,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जयशंकर यांनी ट्रम्प प्रशासनाने दहशतवादाविरोधात केलेल्या मजबूत सहकार्यबद्दल आभार मानले.