नवी दिल्ली -येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी सध्या अयोध्येत सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असून संघ परिवारात आनंद आहे, असे संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
कलम 370 रद्द करणे, सीएए लागू करणे, कोरोनाला रोखण्यासाठीचे लॉकडाऊन किंवा आता राम मंदिरासाठी भूमिपूजन असो, एकामागून एक कामगिरी केल्याबद्दल मोदींच्या नेतृत्त्वाचे राष्ट्रीय स्वयंसेवकाकडून कौतुक केले जात आहे. ही चौथी वेळ आहे, जेव्हा आरएसएसने मोदींची प्रशंसा केली.
आपण सर्वजण भाग्यवान आहोत. देशाला असे राजकीय नेतृत्व लाभले आहे, ज्याने भारत पुन्हा जागतिक स्तरावर कामगिरी करेल आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणा स्त्रोत बनले, असा विश्वास आपल्याला दिला, असे शनिवारी अशोक सिंघल फाऊंडेशनच्या कार्यक्रमात जोशी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला प्रथमच असे सरकार लाभले आहे. जे केवळ आरएसएसला अनुकूल नाही, तर एक मजबूत सरकार देखील आहे. मोदी सरकारने बहुतेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. सर्व समस्या आता संपुष्टात येत आहेत. पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 काढून टाकता आला. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच संघ परिवार खूप आनंदी आहे, असे आरएसएसशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.