चेन्नई :चेन्नईमध्ये दोन विविध घटनांमध्ये पाच हजारांहून अधिक एक्स्टसी पिल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांची एकूण किंमत सुमारे १.६ कोटी असल्याची माहिती कस्टम विभागाने दिली आहे.
या गोळ्या मिथिलेनेडिऑक्सी-मिथॅम्फेटॅमाईन (एमडीएमए) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेल्जिअम आणि नेदरलँड्स या देशांमधून दोन विविध पार्सल्समध्ये या गोळ्या चेन्नईमध्ये आल्या होत्या, अशी माहिती कस्टम आयुक्त राजन चौधरी यांनी दिली.
बेल्जियममधून आलेल्या पार्सलमध्ये ४ हजार ६० गोळ्या मिळाल्या, तर नेदरलँडहून आलेल्या पार्सलमध्ये १ हजार १५० गोळ्या आढळून आल्या. बेल्जियमवरुन आलेले पार्सल हे कांचीपूरम जिल्ह्यातील एका पत्त्यावर आले होते. याची चौकशी केल्यानंतर तो पत्ता खोटा असल्याचे आढळून आले. तर, नेदरलँडहून आलेले पार्सल ज्या पत्त्यावर मागवले होते, त्या व्यक्तीला अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणात आधीपासूनच अटक करण्यात आलेली असल्याचे समाेर आले आहे.
यापूर्वी, जुलैमध्ये नेदरलँडहून आलेल्या अशाच १०० गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या ज्यांची एकूण किंमत ३ लाख होती.