नवी दिल्ली -उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांचा आज हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी आणि आईने त्यांना दिल्लीच्या साकेत रुग्णालयात आणले होते. दरम्यान डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
रोहित शेखर दिल्लीच्या डिफेन्स कॉलोनीमध्ये वास्तव्यास होते. गेल्या वर्षी एन. डी. तिवारी यांचे १८ ऑक्टोंबरला निधन झाले. शेखर यांच्या मृत्यूनंतर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
रोहित शेखर यांनी २००८ मध्ये आपण एन. डी. तिवारी यांचे पुत्र असल्याचा खटला न्यायालयात दाखल केला होता. त्यावरून तिवारी यांना डीएनए तपासणीसाठी स्वतःचे रक्त द्यावे लागले होते. त्यावेळी तिवारी यांनी ही बाब सार्वजनिक न करण्याची न्यायालयात मागणी केली होती. डीएनए अहवालात रोहित हे तिवारींचेच पुत्र आहेत, असा खुलासा झाला होता. त्यानंतर २०१४मध्ये तिवारी यांनी रोहितच्या आईशी वयाच्या ८९ वर्षी लग्न केले होते.
रोहित यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचे एका वर्षापूर्वीच अपूर्वा शुक्ला यांच्याशी लग्न झाले. अपूर्वा या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. न्यायालयाचा विवाद संपल्यानंतर रोहित एन. डी. तिवारी यांच्यासोबत राहात होते. त्यांचा साखरपुड्याच्या वेळी तिवारी रुग्णालयात भरती होते. त्यावेळी संपूर्ण कुटुंबियांसोबत रोहित त्यांना भेटण्यास गेले होते.