देहराडून - मसूरीहून देहराडूनकडे जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकीने समोरून धडक दिल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही धडक इतकी जोरदार होती, की दुचाकीस्वार काही फूट हवेत उसळून खाली कोसळला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे, तर दुचाकी आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मसूरी-देहराडून मार्गावरील घाटात असणाऱ्या बिट अँड बाईट या कॅफेजवळ हा अपघात झाला. अपघात झालेल्या दुचाकीच्या मागून येत असलेल्या दुचाकीवर असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये ही पूर्ण घटना चित्रित झाली आहे. चारचाकी चालक अरुंद रस्त्यावर आपल्यापुढील चारचाकीला चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाल्याचे चित्रीकरणात दिसत आहे. तसेच, दुचाकीचालकही वळणा-वळणांच्या रस्त्यावर दुचाकी वेगाने चालवत असल्याचे दिसत आहे.