नवी दिल्ली - लॉकडाऊनचे भयाण वास्तव समोर येत आहे. उत्तर प्रदेशमध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 24 जण ठार झाले आहेत. तर 35 जण जखमी असून त्यातील 20 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 15 गंभीर जखमींना सैफिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास औरैया जिल्ह्यातील मिहौली भागात अपघात झाला.
उत्तर प्रदेशात ट्रकचा भीषण अपघात; 24 स्थलांतरित मजूर ठार
उत्तर प्रदेशमध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 24 जण ठार झाल्याची माहिती आहे. शनिवारी पहाटे हा अपघात झाला आहे. औरैया जिल्ह्यातील मिहौली भागात अपघात झाला.
दिल्ली येथून येत असलेल्या डीसीएम व्हॅनची ट्रकला जोरदार धडक बसली. जवळपास 50 प्रवासी मजूर घेऊन येणारा हा ट्रक राजस्थानातून येत होता. ट्रकमधील बहुतांश स्थलांतरित हे मूळचे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्दैवी घटनेची दखल घेतली आहे. जीव गमावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच जखमींना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेशही दिले आहेत. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनिश अवस्थी यांनी अपघातासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.