हैदराबाद - देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधातील आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्रसरकारला असलेल्या आपल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केले आहे.
माझे मित्र जगनमोहन रेड्डी यांना मी अशी विनंती करतो, की त्यांनी केंद्राला असलेल्या आपल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करावा. आपल्याला देश वाचवायचा आहे, असे वक्तव्य ओवैसी यांनी हैदराबादमध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीमध्ये केले. या रॅलीमध्ये त्यांनी जे लोक सीएए आणि एनआरसी विरोधात आहेत, त्यांनी आपापल्या घराबाहेर तिरंगा फडकावून आंदोलन करावे, असे लोकांना आवाहन केले. आपल्या घराबाहेर तिरंगा फडकावून या काळ्या कायद्याविरोधात निषेध व्यक्त करावा, आणि भाजपला त्यांची चूक लक्षात आणून द्यावी, असे ते म्हटले.