इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीर मुद्यावर चर्चा झाली. या बैठकीचे इम्रान खान यांनी स्वागत केले आहे.
'जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदने घेतलेल्या बैठकीचे मी स्वागत करतो. जगातील सर्वोच्च राजनैतिक मंचाने 50 वर्षांमध्ये प्रथमच हा मुद्दा उपस्थित केला. काश्मीर वादाचे निवारण करणे ही या जागतिक सुरक्षा परिषदेची जबाबदारी आहे', असे इम्रान खान यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये काश्मीर मुद्यावर चर्चा पार पडली. परिषदेमध्ये रशियाने भारताला तर अपेक्षेप्रमाणे चीनने पाकिस्ताला पाठिंबा दिला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविणे ही भारताची अंतर्गत बाब आहे, अशी भारताची भूमिका परिषदेमध्ये मांडली.
संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्य असलेल्या चीनने काश्मीर मुद्यावर बैठक घेण्याची मागणी केली होती. काश्मीरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात ही दुसऱ्यांदा बैठक झाली आहे. तत्पूर्वी पहिली बैठक 1971 मध्येही याच मुद्द्यावर झाली होती. यूएनएससीची सदस्य संख्या 15 आहे, ज्यात 5 स्थायी आणि 10 अस्थायी सदस्य देश आहेत.