बंगळुरु -देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 294 वर पोहचली आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता मोदींनी देशवासियांना संबोधित केले होते. त्यामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन जनतेला केले होते. त्याप्रमाणे बंगळुरु, फरिदाबाद आणि नोयडामधील नागरिकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. मोदींनी सांगितल्याप्रणाणे शहरातील लोकांनी घराबाहेर येत टाळ्या आणि थाळ्या वाजण्याचा सराव केला.
कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी अनेक जण कार्य करत आहेत. त्यामुळे येत्या 22 मार्चला रविवारी आपल्या घरासमोर उभे राहून टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त करावे, असे आवाहन मोदींनी केले होते.
गुरुवारी पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्देशांचे पालन करण्याचे लोकांना आवाहन केले. यावेळी मोदींनी जनतेला 22 मार्चला देशभरामध्ये जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली. सर्वसामान्य लोकांनी स्वतः हून, स्वतः साठी संचारबंदी लागू करावी. जनता कर्फ्यू म्हणजे जनतेकडून लागू केलेले जनतेसाठीचा कर्फ्यू, अशी व्याख्या मोदींनी सांगितली.
दरम्यान, विरोधकांनी मोदींच्या या कल्पनेचा विरोध केला असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आधीच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाने प्रहार केला आहे. याचा अनेक घटकांवर परिणाम झाला आहे. टाळ्या वाजवल्याने देशातील छोटे व्यवसायिक आणि मजुरांना मदत मिळणार नाही', अशी टीका राहुल गांधींनी केली.