महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीतील डॉक्टरांचा अनोखा निषेध; हेल्मेट घालून केली रुग्णांची तपासणी - Resident doctor

बंगालमध्ये डॉक्टरांच्या संघटनेने ममतांपुढे ६ अटी ठेवल्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारही देण्यात आला आहे.

हेल्मेट घालून केली रुग्णांची तपासणी

By

Published : Jun 15, 2019, 3:18 PM IST

नवी दिल्ली - बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाचे लोण देशभर पसरले आहे. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी आज हेल्मेट घालून रुग्णसेवा करत अनोखा निषेध नोंदवला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेनेही येत्या १७ जूनला देशव्यापी संप पुकारण्याचे आवाहन केले आहे.

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालात उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे नाराज झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी २ ज्युनिअर डॉक्टरांना बेदम मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले होते. बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सुरू केलेला हा लढा उग्र रूप घेत असून बंगालमध्ये आतापर्यंत ३०० डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. काल देशभरात डॉक्टरांनी डोक्याला पट्टी बांधून निदर्शने केली होती. दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी या आंदोलनात अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला. या डॉक्टरांनी चक्क हेल्मेट घालून रुग्णांची तपसाणी केली.


बंगालमध्ये डॉक्टरांच्या संघटनेने ममतांपुढे ६ अटी ठेवल्या असून त्या पूर्ण झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचा इशारही देण्यात आला आहे. बंगालमध्ये आतापर्यंत ३०० डॉक्टरांनी राजीनामा दिला आहे. ममतांनी राज्य सचिवालयात डॉक्टरांना चर्चेसाठी बोलवले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यावर बहिष्कार टाकत ममता आमची एकता तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

या आहेत डॉक्टरांच्या अटी -
१. ममतांनी जखमी डॉक्टरांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल निषेध जाहीर केला पाहिजे.
२. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वत: लवकरात लवकर हस्तक्षेप करावा.
३. सोमवारी रात्री डॉक्टरांना सुरक्षा पुरवताना पोलिसांच्या निष्क्रियेतेची न्यायालयीन चौकशी करावी.
४. हल्लेखोरांबद्दल केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती द्यावी.
५. राज्यात ज्युनिअर डॉक्टर आणि विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
६. सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सशस्त्र बलाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.

ABOUT THE AUTHOR

...view details