हैदरबाद- रविवारची दुपार उजाडली ती अतिशय दुर्दैवी बातमी घेऊनच. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. मुंबईच्या पाॅश वसाहतीतल्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे निश्चित झाले.
३४ वर्षाच्या उभरत्या अभिनेत्याचे आयुष्य एका फटक्यात संपून गेले. हे सत्य आता काही बदलणार नाही, पण बदल करायला हवा तो मीडियाच्या आत्महत्येचे वार्तांकन करण्याच्या पद्धतीत.
काही मिनिटातच टेलिव्हिजन चॅनेल्सवर सगळीकडे 'बिग ब्रेकिंग' झळकू लागली. सगळा फोकस एका तरुणाने आयुष्य संपवले यावर नसून सुशांत सिंह राजपूत याने कशी आत्महत्या केली यावर. अगदी बेडरूमचा दरवाजा उघडल्यावर मृतदेहाभोवती कुठल्या रंगाच्या कपड्यात फास आवळला गेला, हेही सांगितले जात होते. सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह घराबाहेर आणताना Live सुरू होते आणि पाटण्याला त्याच्या प्रचंड दु:खी झालेल्या कुटुंबातल्या लोकांना प्रश्न विचारले जात होते.
अतिशय वाईट गोष्ट म्हणजे तो डिप्रेशनवर उपचार घेत होता, हे समोर येईपर्यंत त्याच्या आत्महत्येमागचे अनेक अंदाज लावले जात होते. त्यात त्याचे व्यावसायिक अपयश, गर्लफ्रेंडबरोबरचे ब्रेकअप ते आर्थिक तंगी अशा अनेक गोष्टींबद्दल बोलले गेले.
सकाळच्या वर्तमानपत्रांमध्येही अपेक्षित होते, तसेच आले. पहिल्या पानावर अभिनेत्याच्या फोटोसकट बातमी आणि त्याने त्याचे मौल्यवान आयुष्य संपवतानाची केलेली सविस्तर कृती होती.
पहिली बातमी ब्रेक करण्याच्या न्यूज चॅनेल्समधल्या स्पर्धेवरच फक्त टीका करायला नको. तर वर्तमानपत्रही छोटे छोटे डिटेल्स देताना एकमेकांशी कमालीची स्पर्धा करत असतात.
ही बातमी महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. पण खरोखर आत्महत्या इतकी प्रकाशझोतात आणणे गरजेचे आहे का? कोणी म्हणेल, या दोन्हीमध्ये फरक करणे खरोखरच कठीण आहे. पण एक गोष्ट यात विसरली जाते, ती म्हणजे आत्महत्येच्या त्याच त्याच बातम्या पुन्हा पुन्हा दाखवल्याने एखाद्याला आपण तसे टोकाचे पाऊल उचलायला उद्युक्त तर करत नाही ना?
जगभरात ५० पेक्षा अधिक संशोधनात हे आढळून आले आहे की, बातमीचे कव्हरेज किती वेळा, किती वेळ आणि किती ठळकपणे दाखवले जाते यावर अनेकदा मानसिक स्थिती चांगली नसलेली व्यक्ती आत्महत्या करायला उद्युक्त होऊ शकते. ज्या व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असतात, त्या मीडियामध्ये अशा बातम्या वाचून आणि पाहून तसेच करण्याची शक्यता जास्त असते.
सेलिब्रिटींच्या संवेदनशील आत्महत्येमुळे अशा लोकांना आत्महत्या करण्याचे प्रोत्साहन मिळू शकते. कारण त्यांना वाटते हे करणे ठीक आहे आणि कदाचित यामुळे आपण लगेचच सेलिब्रिटीही बनू. संशोधनात हे पुढे आले आहे की, मीडियामध्ये आत्महत्यांबद्दलच्या स्टोरीज दाखवल्या तर आत्महत्येचे प्रमाण २.५ वेळा वाढते. यांना 'कॉपीकॅट आत्महत्या' असे म्हटले जाते. हे सिद्ध झाले आहे की, सेलिब्रिटींच्या आत्महत्येनंतर आणि काही प्रमाणात मीडियात नावाजलेल्या राजकीय व्यक्तिमत्त्वांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.
दुसऱ्या बाजूला मीडिया आत्महत्या कशा थांबवायच्या याबद्दल सकारात्मक भूमिका घेऊ शकतो, याच्या शक्यताही वाढत आहेत. 'पापाजेनो स्टडीज'प्रमाणे मीडिया आत्महत्या करायला परावृत्त करू शकतो. त्यासाठी सनसनाटी कमी करून आणि अशा हालाखीच्या, कोसळण्याच्या प्रसंगी कसे सावरायचे याचे जास्तीत जास्त रिपोर्टिंग करून मीडिया आत्महत्या थांबवू शकतो.
आत्महत्येच्या मागे एकमेव कारण नसते. पण अनेकदा मानसिक संतुलन ढासळण्यामुळे डिप्रेशन, तणाव हे आजार वाढतात. कधी कधी हे अनुवंशिकही असते. कुटुंबात आत्महत्या करण्याचा इतिहास असू शकतो. मानसिक त्रास हा इतर आजारांप्रमाणे एक आहे, हे स्वीकारले आणि मानसिक उपचार सगळीकडे सहज उपलब्ध झाले तर आत्महत्या रोखता येऊ शकतील. आत्महत्या करायला जाणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे नुसते ऐकून घेतले तर ती व्यक्ती आपला निर्णय बदलू शकतो. मानसिक आजार असलेल्या व्यक्ती 'वेड्या' असतात, असा समज सर्वत्र असतो. तो काढून टाकला पाहिजे. त्या व्यक्ती वेड्या नसतात.
२००८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्येचे रिपोर्टिंग कसे करायचे याची मार्गदर्शक तत्त्वे आणली. काही कारणाने मीडियात हे नियम पाळले जात नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेने आत्महत्येचे रिपोर्टिंग कसे करायचे याचे ११ मुद्दे दिलेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सनसनाटी करायची नाही आणि मानसिक आरोग्याबद्दल लोकांना जागरूक करून आत्महत्या थांबवायच्या. सनसनाटी नाही म्हणजे हेडलाइनमध्ये 'आत्महत्या' हा शब्द टाळायचा. त्याऐवजी व्यक्तीचा मृत्यू म्हटले तरीही लक्ष वेधले जाते. शिवाय घटनेचे फोटो वापरायचे नाहीत, आत्महत्या कुठे झाली ते ठिकाण दाखवायचे नाही आणि कुठल्या प्रकारे आत्महत्या केली, हेही सांगायचे नाही. अशी मार्गदर्शक तत्त्वे मीडियाने पाळणे अपेक्षित आहे. तसेच त्या कुटुंबाच्या भावनांचा आदर करत त्यांचा बाईट घेऊ नये, त्यांना शूट करू नये आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो घेऊ नये. आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी हेल्पलाइन नंबर आणि आरोग्यसंस्थांचे नंबर दिले तर ते जास्त उपयोगी पडू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. शब्द निवडताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुसाइड नोटमधील मजकूर देण्याची गरज नाही. फक्त एक आत्महत्येसंबंधी पत्र सापडले आहे आणि ते विचारात घेतले आहे एवढेच सांगावे.
लोकांवर परिणाम होईल, असे शब्द वापरू नयेत. जसे आत्महत्येची साथ, आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न. समाजाला मानसिक आरोग्याबद्दल जागरुक करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे की, धोक्याची चिन्हे, हेल्पलाइन नंबर देणे खूप महत्त्वाचे आहे.
आत्महत्येमुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या समस्या संपल्या आहेत, असे म्हणणेही चुकीचे आहे.त्यामुळे एखाद्या आत्महत्या करायचा विचार करणाऱ्याला समस्या संपवण्यासाठी हा मार्ग निवडावा वाटू शकतो.
प्रेस काॅन्सिल ऑफ इंडियाने सप्टेंबर २०१९ मध्ये या मार्गदर्शक सूचनांचे समर्थनच केले. मीडियाला मानसिक आजारी व्यक्तींचे फोटो, फुटेज त्यांच्या परवानगीशिवाय दाखवायला मनाई केली.
पण भारतीय मीडियाचे आत्महत्येचे कव्हरेज हे या सगळ्यापासून खूप दूर आहे. १९८७ मध्ये मीडियाला ही मार्गदर्शक तत्त्वे पाळायला लावणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश ठरला. आता इतर देशही आत्महत्या रोखण्यासाठी मीडियाला सहभागी करतात आणि रिपोर्टिंगची गुणवत्ताही सुधारते.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात २०१८ मध्ये आत्महत्येचे प्रमाण १ लाख लोकसंख्येच्या मागे १०.२ होते. देशात दर वर्षी १.३४ लाख लोक आत्महत्या करतात, तर १.६० लाख आत्महत्यांची नोंदही होत नाही. नोंद होणाऱ्या जास्तीत जास्त आत्महत्या या १४ ते २९ वर्ष या महत्त्वाच्या वयोगटातल्या असतात.
सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू हा मीडियासाठी जागतिक आरोग्य संघटनेने जीव वाचवण्यासाठी दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वापरण्याची मोठी संधी आहे. मीडियातले लोकही अशा अनुभवातून, प्रसंगातून जाऊ शकतात. ते काही अपवाद नाहीत.
सध्या कोरोना व्हायरसच्या काळात अनेक जण तणावात आहेत. भारताने आधीही नोकरी गेल्याने, विथड्राॅल सिम्टम्समुळे आणि अगदी अलिकडे क्वारंटाइन सेंटर्समध्ये या रोगाच्या भयामुळे आत्महत्या होताना पाहिल्या आहेत.
( लेखिका - आरती धर या सीनियर पत्रकार आहेत. )