मुंबई - येत्या काळात काही अनपेक्षित घडलं नाही, तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी म्हणजेच उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्याबाबत संभ्रमात होते. अखेरीस शरद पवारांच्या आदेशानंतर ते मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसण्यास राजी झाले.
मागील शुक्रवारी जेव्हा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षाचे नेते नेहरु सेंटर येथे पहिल्यांदा भेटले. तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झाली. जोपर्यंत उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्त्व करत नाहीत, तोपर्यंत नव्याने स्थापन होणार सरकार स्थिर राहणार नाही, असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांचे मत होते. काँग्रेस पक्षात दोन माजी मुख्यमंत्री आहेत, तर राष्ट्रवादीच्या गोटात दोन माजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यासोबतच दोन्ही पक्षांमध्ये अनेक माजी मंत्री आहेत. त्यांचा सरकार चालवण्याचा अनुभव शिवसेनेतील नेत्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सरकारचे नेतृत्त्व करावे, असे राष्ट्रवादीचे देखील मत बनले.
महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी संभ्रमात होते. त्यावेळी शरद पवारांनी बैठकीतून बाहेर येत सरकारचे नेतृत्त्व करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत होत असल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या हे मान्य केले नव्हते. मात्र, मागील शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरेंच्या वतीने ही माहिती दिली होती. कदाचित दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वत: ही माहिती दिली असती. मात्र, त्याच रात्री अजित पवार भाजपला जाऊन मिळाले आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ झाली.
मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण? हा विषय तिन्ही पक्षांच्या बैठकीत चर्चेला आला. या बैठकीत ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी मनाने पुर्णतहा तयार नसल्याचे समोर आले. त्यावेळीही शरद पवारांनी यात हस्तक्षेप केला. बाळासाहेब ठाकरेंबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबधाचा पाढा पवारांनी वाचून दाखवला. राजकीय मतभेद असतानाही मी आणि बाळासाहेब ठाकरे चांगले मित्र होतो. बाळासाहेब ठाकरे आज ह्यात असते तर त्यांनाही आनंद झाला असता, असे पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी शिवसैनिकाला ज्या साध्या भाषेत समजते त्या भाषेत मुख्यमंत्री पद सांभाळण्याचा आदेश उद्धव ठाकरेंना दिला.
मागील तीन दिवसात स्वत:च्याच पुतण्याने बंड पुकारले तरी तिन्ही पक्ष एकत्र राहतील याची काळजी शरद पवार यांनी एकट्याने घेतली. सर्व राष्ट्रवादी पक्ष स्वत:मागे आणि शिवसेनेमागे असल्याचे शरद पवारांनी दाखवून दिले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांच्या आदेशाला नकार देणे उद्धव ठाकरेंना अशक्य होते. त्यामुळे मुख्यमंत्री पद स्विकारण्यास उद्धव ठाकरे तयार झाले. महाविकास आघाडीने सर्वानुमते निर्णय घेत पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
मुख्यमंत्री पदाची ऑफर स्वीकारण्यास उद्धव ठाकरे का तयार नव्हते? यामागे चार कारणे आहेत.
१) सत्तेपासून दुर राहून सत्ता नियंत्रित करण्याची प्रथा ठाकरे कुटुंबियांत आहे. जबाबदारी शिवाय सत्ताकेंद्र हातात ठेवण्याची कल्पना त्यांना आकर्षीत करत असावी. कधीही सत्तेत येणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार ते सत्तेपासून कायम दुर राहीले. बाळासाहेब ठाकरे दुर राहुन पक्षातील आणि त्यांच्याच सरकारमधील गोष्टी नियंत्रित करण्यात आनंद मानत असत. तसेच सरकारचा 'रिमोट कंट्रोल' माझ्या हातात असल्याचेही ते कायम म्हणत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनीही आत्तापर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग निवडला होता. मात्र, उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होत असल्याने यात खंड पडला. दुर राहुन सत्ता नियंत्रित करणे उद्धव ठाकरेंना जास्त आवडले असते.