तुर्की आणि भारतादरम्यानचे संबंध बऱ्याच काळापासून ताणले गेले आहेत. तुर्कीने वारंवार आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला समर्थन दिले आहे. तसेच, अनेक कारवायांपासून पाकिस्तानला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भूमिका घेतली आहे. काही महिन्यांपूर्वी तुर्कीने भारताला लक्ष्य करीत यूट्यूबवर जम्मू-काश्मीरवर 3 मिनिटांचा 15 सेकंदाचा व्हिडिओ जारी केला. 11 जून 2020 ला हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. दररोज बदलणाऱ्या जागतिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि तुर्कीदरम्यानच्या संबंधांवर एक नजर...
तुर्कीची भारतविरोधी विधाने
भारताने आर्टिकल 370 हटवल्यानंतर - भारताच्या संसदेने 5 ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवले. याच्या दुसऱ्या दिवशी, ६ ऑगस्टला तुर्कीच्या विदेश मंत्रालयाने या वर चिंता व्यक्त करणारे निवेदन जारी केले होते. आर्टिकल 370 हटवल्यामुळे सध्या असलेली तणावाची स्थिती वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.
युएनजीएमध्ये एर्दोगन यांचे भाषण : 24 सप्टेंबर, 2019 रोजी एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत '72 वर्षांपासून तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जम्मू-काश्मीर मुद्द्याकडे 'पुरेसे लक्ष' देण्यात आंतरराष्ट्रीय समुदाय 'अयशस्वी' झाला आहे,' असे सांगितले.
पाकिस्तान दौरा : तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये पाकिस्तानला भेट दिली, तेव्हा त्यांनी पुन्हा काश्मीरबद्दल भाष्य केले.
पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी तुर्कीची कारणे
- तुर्कीने काश्मीरबाबत पाकिस्तानला दिलेला पाठिंबा हा सौदी अरेबियाला शह देण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. सौदी अरेबिया आणि तुर्की हे मुस्लीम जगातील प्रतिस्पर्धी आहेत. पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या बदल्यात तुर्कीला आशा आहे की, इस्लामाबाद अंकाराची बाजू घेईल आणि सौदी अरेबियापासून दूर जाईल.
- दरम्यान, सौदी अरेबिया आणि युएईने भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पुढे याच वस्तुस्थितीचा म्हणजे काश्मीर मुद्द्याचा वापर तुर्कीद्वारे पाकिस्तानला चुचकारण्यासाठी केला गेला.
- तुर्की हाही अशा काही देशांपैकी एक आहे (मलेशिया आणि चीनसह) जे पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्समध्ये (एफएटीएफ) पाठिंबा देतात आणि पाकिस्तानला दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याबद्दल एफएटीएफच्या काळ्या यादीत टाकण्यात येण्यापासून वाचवतात.
भारताचा प्रतिसाद
- एर्दोगन यांनी काश्मीरचा मुद्दा युएनजीएमध्ये उपस्थित केला तेव्हा भारताने तुर्कीच्या भारताविरुद्धच्या चिथावणीखोर वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायप्रसचे अध्यक्ष आणि आर्मेनिया आणि ग्रीसच्या पंतप्रधानांशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीदरम्यान बैठक घेत प्रतिक्रिया दिली. या सर्व राष्ट्रांचे तुर्कीशी विविध वाद आहेत.
- ऑक्टोबर 2019 मध्ये मोदींनी आपला तुर्की दौरा रद्द केला. तुर्की आणि पाकिस्तान यांच्यात वाढत चाललेले संरक्षण संबंध लक्षात घेता भारताने तुर्कीची संरक्षण निर्यात कमी केली आणि तुर्कीकडून आयात कमी केली. याशिवाय, भारताने आर्मेनियासोबतचे संबंध वाढवले. आर्मेनियासोबत भारताने 40 दशलक्ष डॉलर्सचा संरक्षण करार केला. या करारानुसार भारत चार शस्त्रे शोधणाऱ्या रडारांचा आर्मेनियाला पुरवठा करणार आहे.