नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या कारवाईने वेग घेतला आहे. पोलिसांनी इक्बाल सिंगला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यात इक्बाल सिंग सहभागी होता. २६ जानेवारीनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर 50 हजारांचा इनाम ठेवला होता.
पंजाबमधील होशियारपूरमध्ये तो असल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलला मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. चौकशीसाठी त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले आहे. प्रजास्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचा तपास दिल्ली गुन्हे शाखा करत असल्याने पोलिसांनी इक्बाल सिंगला गुन्हे शाखेकडे सोपवले आहे.
आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला दिप सिद्धूलाही अटक -
दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दीप सिद्धूला 9 फेब्रुवरी रोजी अटक केली आहे. 26 जानेवारीनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर 1 लाख इनाम ठेवला होता. सुमारे 15 दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा मिळवला तेव्हा दीप सिद्धूने फेसबुक लाईव्हही केले होते. त्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. आत्तापर्यंत पोलिसांनी शेकडो आंदोलकांना हिंसाचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
काय प्रकरण ?
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड हिंसक निदर्शनात रूपांतरीत झाली. शेकडो शेतकऱ्यांनी परेड काढून ट्रॅक्टरसह लाल किल्ल्यात प्रवेश केला. तसेच त्यांनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवर धार्मिक ध्वज फडकावला. लाल किल्ला परिसरात तोडफोड केली. ज्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तर दिप सिद्धूला आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी जाणूनबुजून भाजपानेच घुसवल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. पंतप्रधान मोदी, दिप सिद्धू आणि अभिनेता आणि खासदार सनी देओल यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.