भोपाळ- भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कोरोना विषाणूला घालवण्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत हनुमान चालिसा मंत्र म्हणण्याचा उपाय नागरिकांना सुचवला आहे. दिवसातून 5 वेळा जर हनुमान चालिसा मंत्रपठण केला तर जग कोरोना महामारीतून मुक्त होईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. 5 ऑगस्टला राममंदिराचे भूमिपूजन होणार आहे, तोपर्यंत घरात राहून मंत्रजप करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
जगभरात आणि भारतातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संशोधक आणि वैज्ञानिक कोेरोनावर लस शोधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, हनुमान चालिसा दिवसातून पाच वेळा म्हणल्याने कोरोनापासुन मुक्ती मिळेल, असा उपाय त्यांनी नागरिकांना सुचवला आहे.
“चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करू. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचे पठण करा. ५ ऑगस्टला भगवान रामाची आरती झाल्यानंतर घरात दिवा लावून मंत्रपठणाचा समारोप करावा.”, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. मध्यप्रदेश सरकार कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. भोपाळ शहरात 4 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे. मात्र, हनुमान चालिसा पठण 5 ऑगस्टला संपेल. हा दिवस आपण दिवाळीसारखा साजरा करू. संपूर्ण भारतातील हिंदू एकाच आवाजात हनुमान चालिसा म्हटल्याने नक्कीच आपण कोरोनापासून मुक्त होऊ. ही तुमची रामलल्लाला प्रार्थना असेल, असे ठाकूर म्हणाल्या.