महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 10, 2019, 6:45 PM IST

ETV Bharat / bharat

कांद्यावरील संकट कशामुळे?

कांद्याचा प्रतिकिलो भाव 100 रुपयांवर गेल्याने नागरिकांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या संपूर्ण देशासह शेजारील देशांमध्येदेखील ही समस्या डोके वर काढत आहे. हे संकट उद्भवण्याचे कारण काय? कांद्याची भाववाढ झाल्यानंतर भीतीचे वातावरण का निर्माण होते? यामध्ये सरकारची काय भूमिका आहे?

Onion crisis In India
कांद्यावरील संकट कशामुळे?

कांद्याचे भाव वाढल्याने नागरिकांच्या डोळ्यात अश्रू..

कांद्याचा प्रतिकिलो भाव 100 रुपयांवर गेल्याने नागरिकांना अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपल्या संपूर्ण देशासह शेजारील देशांमध्येदेखील ही समस्या डोके वर काढत आहे.

हे संकट उद्भवण्याचे कारण काय? कांद्याची भाववाढ झाल्यानंतर भीतीचे वातावरण का निर्माण होते? यामध्ये सरकारची काय भूमिका आहे?

भारतातील कांद्याची लागवड..

आपल्या देशात दरवर्षी 12 लाख हेक्टर उत्पादन क्षेत्रात कांद्याची लागवड केली जाते. यामधून 1.94 कोटी टन म्हणजेच प्रति हेक्टर 16 टन कांद्याचे दरवर्षी उत्पादन होते. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये कांद्याचे पिक घेतले जाते.

यंदा एकट्या महाराष्ट्र राज्यात खरिपात 76 हजार 279 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली, तर दुसरीकडे आंध्र प्रदेशातील कर्नुल बाजारपेठेत कांद्याचा सोमवारचा भाव क्विंटलमागे 10,150 रुपये एवढा होता.

ही समस्या कशामुळे?

कांद्याचे पीक घेणाऱ्या राज्यांमध्ये यंदा मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. महाराष्ट्रात नेहमीच्या तुलनेत दीडपट अधिक पाऊस झाला तर गुजरातमध्ये हे प्रमाण दुप्पट होते. मध्यप्रदेश, गुजरातसारख्या राज्यांमध्ये यंदा 70 टक्के अधिक तर तेलंगणामध्ये 65 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

परिणामी, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात, अनेक ठिकाणी, शेतकऱ्यांना दोनदा पेरणी करावी लागली होती. काही ठिकाणच्या पिकांनी तग धरला परंतु, ज्या ठिकाणी उशीरा पेरणी झाली तिथे विशेष उत्पादन मिळाले नाही.

एरवी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बाजारपेठेत दाखल होणारा कांदा यावेळी शेतांमध्येच पडून होता. याचदरम्यान मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले.

एक व्यक्ती किती कांदा खातो..

भारतात प्रत्येक नागरिक वर्षाला सरासरी 19 किलो कांद्यांचे सेवन करतो.

सरकारची भूमिका काय?

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्या देशातून 3,467 कोटी रुपयांच्या कांद्याची निर्यात झाली. परंतु, सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत, नागरिकांची गरज पुरवण्यासाठी आणि भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यापर्यंत निर्यात थांबवली आहे. परंतु, यामुळे कांद्यासाठी भारतावर अवलंबून असणाऱ्या देशांची अडचण निर्माण झाली आहे.

भारताने अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण आणि इजिप्त या देशांमधून लाखो टन कांद्याची आयात सुरू केली आहे.

शेजारी देशांमधील परिस्थिती..

  • बांगलादेश - तेथील पंतप्रधानांनी कांद्याचे पिक घेण्यास बंदी घातली आहे. तेथील कांद्याचे भाव किलोमागे 30 टकावरुन (25 भारतीय रुपये) 260 टका (218 भारतीय रुपये) झाले आहेत.
  • म्यानमार - एक विसा (1.6 किलो) कांद्याचा क्यातमधील भाव 450 वरुन 850 क्यातवर पोहोचला आहे. एक क्यातचे मूल्य 0.47 भारतीय रुपयाएवढे आहे.
  • नेपाळ - नोव्हेंबरमध्ये कांद्याचा किलोमागे भाव 100 नेपाळी रुपयांवरुन 150 नेपाळी रुपयांवर पोचला होता. यामुळे बिहार सीमेवरुन कांद्याची तस्करी झाली. एक नेपाळी रुपयाचे मूल्य 0.62 भारतीय रुपयाएवढे आहे.
  • पाकिस्तान - पाकिस्तान सरकारदेखील भाववाढीवर नियंत्रणाच्या समस्येचा सामना करीत असून एक किलो कांद्याचा भाव 70 पाकिस्तानी रुपये एवढा झाला आहे. पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 0.46 भारतीय रुपयाएवढे आहे.
  • श्रीलंका - गेल्यावर्षी कांद्याचा भाव 95 श्रीलंकन रुपये होता. आता हा दर 158 श्रीलंकन रुपये (62 भारतीय रुपये) एवढा झाला आहे.

हेही वाचा : भाजीपाल्याच्या दराचे वास्तव; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल

ABOUT THE AUTHOR

...view details