नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारचा गब्बर सिंग टॅक्स घसरत्या जीडीपीचे सर्वांत मोठे कारण आहे, असे राहुल गांधींनी टि्वट केले आहे.
मोदी सरकारच्या गब्बर सिंग टॅक्समुळे लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोटीने नोकऱ्या गेल्या असून युवकांचे भविष्य धोक्यात आहे. राज्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. जीएसटी म्हणजे आर्थिक सर्वनाश होय, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था कशी नष्ट केली, या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ सिरीज सुरु केली आहे. या सिरीजच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी मोदी सरकारचा 'गब्बर सिंग टॅक्स हा घसरत्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत मोठे कारण असल्याचं म्हटल. तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) ही करप्रणाली नाही. तर ती भारताच्या गरिबांवरील आक्रमण आहे. जीएसटी म्हणजे अर्थिक सर्वनाश, असे ते म्हणाले.
दरम्यान, एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 23.9 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण झाली आहे. ही गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठी विकासदरातील घसरण आहे. कोरोना महामारीमुळे देशात 25 मार्च 2020 ला टाळेबंदी लागू केल्यानंतर देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे. बांधकाम, व्यापार, निर्मिती, पर्यटन, मनोरंजन यासह सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेकांचे रोजगारही गेले आहेत. तर उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत.