लखनऊ- लग्नाच्या एका दिवसानंतर, घरातील लोकांच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून, घरातील पैसे आणि किंमती सामान घेऊन तरुणी फरार झाली होती. या तरुणीला उत्तर प्रदेश पोलिसांनी एक महिन्यानंतर अटक केली आहे. सोबतच, तिच्या बहिणीलादेखील अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत या तरुणीसोबत मोठी टोळी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या टोळीने, कित्येक शहरांमध्ये अशाच प्रकारे लग्न आणि लूट केली आहे. पोलीस आता अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
मुरादाबाद मधील हरथला कॉलनीत राहणाऱ्या संजय नामक तरुणाचे लग्न पूजा नावाच्या तरुणीशी झाले होते. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पूजाची मावशी तिला भेटण्यास आली आणि रात्री तिथेच मुक्कामी राहिली. दुसऱ्या दिवशी संजय आणि त्याच्या घरच्यांना जाग आल्यानंतर, पूजा आणि तिची मावशी या दोघीही गायब असल्याचे आढळून आले. यासोबतच घरातील रोकड आणि दागिनेही गायब होते. बऱ्याच शोधानंतरही जेव्हा पूजा आणि तिच्या मावशीचा पत्ता लागला नाही, तेव्हा संजयच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी तपास करत पूजा आणि तिच्या बहिणीला बरेली जनपदवरील बहेडी मधून ताब्यात घेतले.