सिरसा (हरयाणा) -लैंगिक शोषण प्रकरणात रोहतक येथील सुनरिया तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला 24 ऑक्टोबरला एका दिवसाची पॅरोल मिळाली होती. या कालावधीत तो आपल्या आजारी आईला भेटायला गुरुग्राम येथील रुग्णालयात गेला होता. बलात्कार आणि हत्याप्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला मागील काही दिवसांत एका दिवसासाठी पॅरोल मिळाला होता. यादरम्यान, राम रहीमला कडेकोट सुरक्षेत रोहतक तुरुंगातून गुरुग्राम येथे आणण्यात आले. मात्र, विशेष म्हणजे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनाही याची माहिती मिळाली नव्हती. फक्त मुख्यमंत्री आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांनाच याबाबत माहित होते.
राम रहिमच्या पॅरोलसंदर्भात माहिती देताना चौधरी रणजीत सिंह, तुरुंगमंत्री, हरयाणा याबाबत काय म्हणाले तुरुंगमंत्री -
जेव्हा राम रहीमला पॅरोल मिळाली तेव्हा कुणालाच याबाबत माहीत नव्हते. हरयाणा सरकारने अत्यंत गुप्त पद्धतीने गुरमीत राम रहीमला पॅरोल दिली होती. त्याला हा पॅरोल 24 ऑक्टोबरला देण्यात आला. याचा खुलासा आता झाला झाला आहे. याप्रकरणी तुरुंगमंत्री चौधरी रणजीत सिंह म्हणाले, 24 ऑक्टोबरला डेराप्रमुख गुरमीत राम रहीमला गुरुग्राम रुग्णालयात दाखल असलेल्या त्याच्या आजारी आईच्या भेटीसाठी घेऊन जाण्यात आले. ते म्हणाले, पॅरोल प्रकरणांत कायदा हा आहे की, जर कुणाच्या घरी आपत्कालीन परिस्थिती असेल तर कैद्याला एक दिवस भेटीसाठी घरी घेऊन जाण्यात येते.
तुरुंगमंत्री म्हणाले, याच कायद्यानुसार, पोलीस सुरक्षेत गुरमीत राम रहीमला 24 ऑक्टोबरला त्याच्या आईची भेट झाल्यावर परत आणण्यात आले. तसेच 10 किंवा 15 दिवसांसाठी पॅरोल द्यावे लागले असते तर हे प्रकरण न्यायालयात गेले असते. मात्र, एका दिवसाच्या पॅरोलसाठी तुरुंग अधीक्षकांना अधिकार आहेत. ते एका दिवसाची पॅरोल मंजूर करू शकतात. तसेच या प्रकरणाची माहिती मला आधीच देण्यात आली होती, असेही तुरुंगमंत्री रणजीत चौधरी यांनी सांगितले.