नवी दिल्ली - येस बँकेचे माजी कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबावर तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूरला लंडनला निघाली असता तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आले आहे. देश सोडण्यास तिला परवानगी नाकारण्यात आली आहे.
येस बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी सीईओ राणा कपूर यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. राणा कपूर यांचे जावई आदित्य याच्यासह संपूर्ण कुटुंबाविरोधात 'लुक आऊट नोटीस' जारी करण्यात आली आहे.
तब्बल 30 तासाहून अधिक वेळ येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ईडीकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे राणा कपूर देत नसल्याने ईडीने त्यांना अटक करून न्यायालायत हजर केले. ईडी न्यायालयाने राणा कपूर यांची रवानगी ११ मार्चपर्यंत ईडी कोठडीत केली आहे.
याबरोबरच राणा कपूर यांच्या ३ मुली राखी कपूर टंडन, रश्मी कपूर, रोशनी कपूर यांच्यासह पत्नी बिंदू कपूर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानी ईडीने छापे मारले आहेत. बिंदू कपूर या सध्याच्या घडीला १८ कंपन्यांच्या संचालक पदावर असून, रोशनी कपूर या २३ तर रश्मी कपूर या २० कंपनीवर संचालक म्हणून आहेत. या प्रकरणात मनी लॉन्डरिंग मोठ्या प्रमाणावर केली असल्याचा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला.