हैदराबाद - शुक्रवारी दुपारी प्रख्यात गायक- संगीतकार एसपी बालसुब्रमण्यम यांच्या दु:खद निधनाची बातमी आली; आणि यानंतर सर्वच स्तरांमधून हळहळ व्यक्त होऊ लागली. गीतकार बालसुब्रमण्यम यांच्या जाण्याने भारतीय संगीताचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली.
'रामोजी ग्रुप'चे संचालक रामोजी राव यांनीही दिग्गज गायक बालसुब्रमण्यम यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. तसेच तेलुगू भाषेत एक व्हिडिओ प्रसिद्ध करत बालसुब्रमण्यम यांच्या आठवणींना उजाळा दिला. एसपी हे फक्त प्रख्यात संगीतकार नसून ते माझे अत्यंत जवळचे साथीदार होते, असे रामोजी राव यांनी म्हटले. त्यांनी भारतीय संगीतात जवळपास पाच दशके 16 विविध भाषांमध्ये गाणी गायली. येणाऱ्या शतकाहून जास्त वेळ त्यांची गाणी चाहत्यांची मनं जिंकत राहतील, असे संचालक म्हणाले.