हैदराबाद - माध्यम क्षेत्रातील आघाडीच्या ईटीव्ही नेटवर्कने २७ ऑगस्टला आपली २५ वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. यानिमित्ताने रामोजी समूहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी श्रोत्यांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. ईटीव्हीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ईटीव्हीचे प्रसारण सुरू झाल्यापासून तेलगू लोकांसह इतरही लोकांनी आपले मानले. श्रोत्यांनी ईटीव्हीला खूपच पसंती दिली. तुमचे प्रेम, तुमचे आशीर्वाद खूप मौल्यवान आणि अनमोल आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वसामान्य लोकांचा विजय आहे. हा गौरव तुमचा आहे, हा इतिहासही तुमचा आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. एखादे लहान मूल जन्माला येते आणि ते आपल्या डोळ्यांसमोर लहानाचे मोठे होते. हा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. गेल्या २५ वर्षांची पाने आपण एक एक करुन पलटून पाहतो, तेव्हा आपल्याला छोट्या-मोठ्या घटनांच्या बातम्यांसह मनोरंजनाने एकापेक्षा एक सरस कार्यक्रम आजही आठवतात. ईटीव्हीवरून प्रसारित होणारा कोणताही कार्यक्रम चांगलाच आणि आरोग्यदायी असला पाहिजे, असे मी ईटीव्ही सुरू झाल्यापासून म्हणत आलो आहे. या निश्चयाला आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे जपले आहे.