महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्येतील राम मंदिर एक हजार वर्षे टिकेल, भूकंपातही ठरणार अभेद्य

प्रस्तावित राम मंदिर स्थापत्यशास्त्रातील ‘नगारा शैली’त बांधले जाणार आहे. याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन घुमट नसून पाच घुमट असणार आहेत. या मंदिरात एका वेळेस 10 हजार भाविक सामावू शकतील, एवढे मोठे मंदिर असेल असे वास्तुविशारद सोमपुरा यांनी सांगितले आहे.

राम मंदिर
राम मंदिर

By

Published : Aug 1, 2020, 5:20 PM IST

अयोध्या (उत्तर प्रदेश) - अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिर केवळ भव्य नाही तर, अत्यंत मजबूतही असेल, असा दावा मंदिराचे स्थापत्यतज्ज्ञ चंद्रकांत सोमपुरा यांनी केला आहे. सोमपूरा 77 वर्षांचे असून ते मंदिर वास्तुविशारदांच्या कुटुंबातून आलेले आहेत. हे मंदिर 10 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा हादराही सहन करू शकेल, इतके मजबूत असेल, असा दावा केला आहे. यामुळे हे मंदिराची मूळ वास्तू एक हजार वर्षांहून अधिक काळ तिचे सौंदर्य टिकवून ठेवू शकेल, असे ते म्हणाले.

प्रस्तावित राम मंदिर स्थापत्यशास्त्रातील ‘नगारा शैली’त बांधले जाणार आहे. याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन घुमट नसून पाच घुमट असणार आहेत. या मंदिरात एका वेळेस 10 हजार भाविक सामावू शकतील, एवढे मोठे मंदिर असेल असे वास्तुविशारद सोमपुरा यांनी सांगितले आहे. उत्तर प्रदेश गुजरात आणि राजस्थानातील सर्व प्राचीन मंदिरे अशाच प्रकारच्या वास्तुशास्त्रानुसार बांधलेली आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिराचे याआधी प्रस्तावित करण्यात आलेले मॉडेल बदलण्यात आले. संत पुजारी आणि अन्य समर्थकांच्या सूचनांनुसार हे बदल करण्यात आले. रामलल्ला मंदिर दोन एकरात बांधले जाणार आहे. उर्वरित 67 एकरांमध्ये विविध प्रकारची झाडे, वस्तुसंग्रहालय आणि इतर संबंधित इमारती असतील.

या मंदिरात एकाच वेळी 10 हजार भाविक येथील दैवतांचे दर्शन घेऊ शकतील. मंदिरासाठी दगड बनवणाऱ्या कार्यशाळेचे पर्यवेक्षक अन्नुभाई सोमपुरा यांनी हे मंदिर एक हजार वर्षाहून अधिक काळ असेच्या असे राहील, असे सांगितले. मंदिरासाठी राजस्थानातून दगड आणले गेले आहेत. तसेच, मंदिराचे दीर्घायुष्य रहावे, यासाठी दोनशे फूट खोल खोदल्यानंतर मातीची चाचणीही घेण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथील वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा केला होता. न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला नवीन मशिदीच्या बांधकामासाठी पर्यायी पाच एकराचा भूखंड उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या भागात देण्याचे निर्देश केंद्राला दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details