नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सीएए कायदा लागू करून मानवी कल्याणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मात्र, विरोधक आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लीम समुदायाला भडकवण्याचे काम करत असून नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात खोटी माहिती पसरवत असल्याचे राम माधव म्हणाले.
देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. मोठ्या प्रमाणात अत्याचार सहन केल्यानंतर ज्या लोकांनी भारतामध्ये शरण घेतले आहे. त्या लोकांना देशाचे पंतप्रधान सन्मानाने नागरिकत्व बहाल करतील. १९५० साली झालेल्या नेहरू-लियाकत कराराप्रमाणे दोन्ही देशांनी त्यांच्याकडील अल्पसंख्य समाजाच्या संरक्षणाची हमी दिली होती. मात्र नेहरू-लियाकत कराराचा काहीही उपयोग झाला नाही. पाकिस्ताने तेथील हिंदू अल्पसंख्याक समाजावर अत्याचार केला, असे राम माधव म्हणाले. राम माधव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. बंगाली भाषिक हिंदू शरणार्थी लोकांनी तुमचे काय बिघडवले आहे. तुम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध कशासाठी करत आहात, असा सवाल राम माधव यांनी केला. दरम्यान देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन आंदोलन सुरू आहेत. बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला विरोध करत राज्यात लागू न करण्याची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात सभेला संबोधित केले. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.