लखनऊ - अयोध्या येथे होणाऱ्या राम लीला कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दुरदर्शनवर होणार आहे. हा कार्यक्रम राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आयोजित केल्याचे उत्तर प्रदेश सरकारच्या माहिती विभागाने सांगितले.
दूरदर्शनवरून होणार 'राम लीला'चे थेट प्रक्षेपण - राम लीला थेट प्रक्षेपण
कोरोनाचा धोका लक्षात घेता, दूरदर्शनवरून 'राम लीला'चे थेट प्रक्षेपण होणार आहे. तसेच दूरदर्शन व्यतिरिक्त, राम लीला इंटरनेट, यूट्यूब आणि सरकारच्या अन्य सोशल मीडिया चॅनेलवरही थेट प्रसारित केले जाणार आहे.
पहिल्या दिवशी अयोध्याच्या सरयू नदीकाठावरील लक्ष्मण किला येथून राम लीलाचे थेट प्रक्षेपण होणार असून दुरदर्शन व्यतिरिक्त यूट्यूबवर आणि सरकारच्या अन्य सोशल मीडिया वाहिन्यांवरूनही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना घरी बसून बघता यावा, यासाठी दुरदर्शनतर्फे जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी वेम्पती यांनी टि्वटद्वारे दिली. या कार्यक्रमाची सर्व तयारी दुरदर्शनच्या टीमने केली असून नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये दुरदर्शनवर रामलीलाचे थेट प्रक्षेपण करताना आम्हाला आनंद होत असल्याचेही ते म्हणाले.
हा कार्यक्रम १७ ते २५ ऑक्टोबर दरम्यान संध्याकाळी ७ वाजता दुरदर्शनवर प्रक्षेपित होणार आहे.