नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. आज शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके पारित झाली आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयके मांडली होती. यादरम्यान, विधेयकांविरोधात विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली.
राज्यसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ व घोषणाबाजीत कृषीविषयक विधेयके मंजूर
आज शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके पारीत झाली आहेत.
शेतकऱ्यांच्या मुद्यांवर विरोधपक्षांनी राज्यासभेत गदारोळ घातला. काही खासदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी रुल बूकची प्रत फाडून आपला विरोध नोंदवला. पंतप्रधान शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असे ते म्हणाले. तसेच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे म्हटलं.
शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. या विधेयकांचा शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.