नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज, भारत-चीन सीमावादाविषयी संसदेला संबोधित करु शकतात. लोकसभेच्या कामकाजाच्या वेळापत्रकानुसार, आज संरक्षणमंत्री लोकसभेमध्ये बोलणार आहेत. विरोधी पक्ष वारंवार भारत-चीन मुद्दा चर्चेसाठी मांडण्यात यावा अशी मागणी करत असल्यामुळे राजनाथ सिंह आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
काही दिवसांपूर्वीच मॉस्कोमध्ये सिंह यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती. तर, मॉस्कोमध्येच देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली होती.
चीनी सैनिक भारतीय हद्दीत करत असलेल्या घुसखोरीमुळे एप्रिल महिन्यापासूनच दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीत देशाच्या २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यानंतर डीएस्केलेशन प्रक्रिया सुरू असतानाच, पुन्हा ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरमध्ये चीनी सैनिक सीमेच्या अगदी जवळ दिसून आले. त्यामुळे सीमेवरील तणाव अद्यापही कायम आहे.
दरम्यान, मंगळवारी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीची व्हर्चुअल बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात मोठे बदल करण्यात आले आहेत. १४ सप्टेंबरला सुरू झालेले हे अधिवेशन १ ऑक्टोबरला संपणार आहे.
हेही वाचा :नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार अनेक स्तरांवर काम करत आहे - पोखरियाल