नवी दिल्ली -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज (शनिवार) दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर गेले आहेत. दिल्लीवरून ते पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला आधी जाणार आहेत. या दौऱ्यात ते पूर्व हिमालयातील सीमाभागात तैनात असलेल्या भारतीय सैनिकांशी चर्चा करणार आहेत. सिक्कीममध्ये सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी ते चर्चा करणार आहेत.
पूर्व हिमालय भारतासाठी मोक्याचा
पूर्व हिमालयातही भारताची चीनबरोबर सीमा आहे. २०१७ साली चीनसोबत या भागात वाद झाला होता. सध्या लडाखमध्ये भारत-चीन सीमावाद सुरू असल्याने भारतीय लष्कराकडून संबंध सीमेवर लष्ककाराची तयारी सुरू आहे. संरक्षण मंत्री या भागातील सैन्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत, तसेच जवानांचे मनोबल वाढविणार आहेत. ईशान्य भारत आणि पूर्व हिमालयावर चीनचा कायमच डोळा राहिला आहे. त्यामुळे भारताने या भागातही सज्जता वाढविली आहे. डोकलामवरून दोन्ही देशांमध्ये वाद झाला होता. तर संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर चीनने दावा सांगितला आहे.