नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी (४ मे रोजी) उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना ‘राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी होते. हाच शिक्का घेऊन त्यांचा जीवनप्रवास संपला’, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, मोदींच्या या वक्तव्यावरुन वाद सुरु असतानाच शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते मंजिंदर सिंग सिरसा यांनी राजीव गांधींनी 'भारतातील सर्वांत मोठे मॉब लिंचर' म्हणून संबोधले आहे.
'राजीव गांधी हे असे एकमेव पंतप्रधान होते, ज्यांनी विशिष्ट समाजाच्या लोकांची जमावाने हत्या घडवून आणली. पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींना पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हटले ते खरेच आहे. त्याशिवाय ते भारतातील सर्वांत मोठे मॉब लिंचर आहेत,' असे सिरसा यांनी म्हटले आहे. 'राजीव गांधींनी केवळ शिखांच्या हत्यांना प्रोत्साहन दिले नाही तर, जे यात सहभागी होते, त्यांना संरक्षण दिले आणि पारितोषिकेही दिली,' असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनी १९८४ च्या शीख दंगलींमध्ये गांधी परिवाराचा सहभाग नसल्याचे सांगितले. तसेच, पीडितांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची साधी विचारपूसही केली नाही. याचे स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, भाजपचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी आपल्या ट्विटरवरुन राजीव गांधीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले आहे. बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ (राजीव गांधी हे मॉब लिंचिंगचे जनक आहेत) असा आशय असलेल्या होर्डिंगचा फोटो ट्विट केला आहे.
‘राजीव गांधी हे भारतातील सर्वांत मोठे मॉब लिंचर’, अकाली दलाच्या प्रवक्त्याचे वादग्रस्त वक्तव्य - manjinder singh sirsa
'राजीव गांधी हे असे एकमेव पंतप्रधान होते, ज्यांनी विशिष्ट समाजाच्या लोकांची जमावाने हत्या घडवून आणली. पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींना पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हटले ते खरेच आहे. त्याशिवाय ते भारतातील सर्वांत मोठे मॉब लिंचर आहेत,' असे सिरसा यांनी म्हटले आहे.
काय आहे या होर्डिंगची पार्श्वभूमी?
मागील वर्षी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच ऑगस्ट महिन्यामध्ये बग्गा यांनी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ अशी होर्डिंग दिल्लीमध्ये लावली होती. त्याच होर्डिंगचा फोटो त्यांनी आता पुन्हा पंतप्रधानांच्या वक्तव्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर ट्विट केला आहे. ‘राजीव गांधी हे तुमच्यासाठी’ असे त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.