बाडमेर - जिल्ह्यातील जसोल या गावात येथे जोरदार वारा आणि पावसामुळे रामकथा मंडप कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
या मंडपामध्ये श्री राम कथा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान, जोरदार वारा आणि पावसामुळे मंडप कोसळल्याने ही दुर्घटना घडली. त्याचवेळी विद्यूत तार तुटल्याने मंडपामध्ये वीजप्रवाह पसरला. विजेच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाला. तसेच, गुदमरल्यानेही काही जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे. जखमींना नाहटा येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.