नवी दिल्ली -राजस्थानात सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर जयपूर-दिल्ली महामार्गावरील हॉटेलमध्ये थांबलेल्या अशोक गेहलोत यांच्या गोटातील आमदारांना शुक्रवारी जैसलमेर येथे हलविण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आमदारांना हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आमदारांना संबोधित करणार आहेत.
जयपूर शहरापासून जवळच असलेल्या ‘फेअरमॉण्ट’ हॉटेलवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांना 13 जुलैपासून ठेवण्यात आले होते. राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापर्यंत म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
राजस्थान विधानसभेचे अधिवेशन 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाची तारीख जाहीर झाल्यापासूनच आमदारांच्या घोडेबाजाराने वेग धरला, असा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.