जयपूर - राजस्थानात सुरू असलेला सत्तासंघर्ष संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि बंडखोर आमदार आजच्या काँग्रेसच्या बैठकीवेळी एकाच मंचावर दिसून आले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते हे राजस्थानातील सत्ता नाट्यावरून दिसून आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याबाबत अपमानकारक वक्तव्य केले होते. तरीही दोघांमधील दुरावा आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. दोन्ही नेत्यांनी गळाभेट आणि हस्तांदोलनही केले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकी असल्याचे यावेळी दिसून आले. मात्र, उद्या विश्वासदर्शक ठरावात सर्व स्पष्ट होईल.
पायलट-गेहलोत एकत्र मंचावर पायलट-गेहलोत मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. ते आज विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत शेजारीशेजारी बसल्याचे दिसून आले. या बैठकीत सचिन पायलट यांना मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने महत्त्व दिल्याचे दिसून आले. मंचावर काँग्रेसचे संघटन मंत्री के. सी वेणूगोपालही सचिन पायलट यांच्या शेजारी बसले होते.
पायलट-गेहलोत एकत्र मंचावर बैठकीच्या सुरुवातील काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काँग्रेस पक्ष एकजूट असल्याचे दाखविण्यासाठी सर्व नेत्यांनी हात वर करून विजयी मुद्रा दाखवली. बैठकीनंतर सर्व आमदार एकाच हॉटेलात गेले की, वेगवेगळ्या ठिकाणी राहिले, हे समजू शकले नाही.
राजस्थानात उद्या(शुक्रवार) विधीमंडळाचे सत्र सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामध्ये वाद सुरू होता. आज सत्ताधारी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांची बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सचिन पायलटही उपस्थित होते. दरम्यान, उद्या सभागृहात काँग्रेस सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.
अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रस्तावावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेला वाद निवळत असल्याचे दिसून येत आहे. सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी सरकार विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने लक्ष घातल्याने हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे.