जयपूर -राजस्थानात आज(शुक्रवार) विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरु आहे. काँग्रेस सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेले सत्तानाट्य संपुष्टात आले आहे. गुरूवारी सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री गेहलोत यांची भेट घेतली. त्यानंतर दोघांमधील वाद मिटल्याचे दिसून येत आहे.
भाजपने काल विधानसभेत अविश्वासदर्शक ठराव मांडण्याची घोषणा केली होती. काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरु असून राज्याचा विकास थांबला आहे, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले होते. मात्र, भाजपकडे बहुमताची कमतरता होती. आज अधिवेशनात काँग्रेसने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याने गेहलोत यांची खुर्ची शाबूत राहीली.
राजस्थान सरकार आणि काँग्रेसच्या एकतेचा विजय होईल, असे आज सकाळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले होते. सत्याचा विजय होईल, असे ट्विट त्यांनी केले होते. २०० जागा असेलल्या राजस्थान विधासभेत भाजपचे ७२ आमदार आहेत. तर काँग्रेसच्या बाजूने १०७ आमदार आणि अपक्ष आणि पाठिंबा देणाऱ्या आमदारांचे संख्याबळ आहे.
माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया
विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सचिन पायलट यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. सरकारने मांडलेला विश्वासदर्शक ठराव मोठ्या बहुमताने पास झाला आहे. विरोधकांनी अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, निकाल आमच्या बाजूने लागला, असे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले.
सभागृहात बसण्याची जागा बदल्यावरही माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी उत्तर दिले. माझी जागा का बदल्यात आली? यावर मी दोन मिनीटे विचार केला. माझी जागा सरकार आणि विरोधकांतील सीमारेषा आहे. कणखर आणि मजबूत योद्ध्यांना सीमेवर पाठविले जाते, असे सचिन पायलट म्हणाले.