जयपुर -मागील दोन दिवसापासून काँग्रेसच्या आमदारांना जयपूर येथे मुक्कामास ठेवण्यात आले आहे. शनिवारी रात्री राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आदि उपस्थित होते.
काँग्रेसच्या आमदारांचा जयपूरमध्ये मुक्काम,राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी घेतली भेट
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा, सत्तेत सहभागी व्हायचे? यासाठीचा निर्णय काँग्रेसकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजपला सरकार स्थापनेची संधी मिळाली आहे पण त्यातही ते अपयशी ठरत आहेत. कर्नाटकमध्ये देखील त्यांनी आमदारांचा घोडेबाजार करून परिस्थिती बिघडवली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रामध्येदेखील तीच परिस्थिती उद्भवली आहे. भाजप केंद्रातील सरकारी यंत्रनाचा गैरवापर करत आहे, अशी टीका खर्गे यांनी केली.
आज देशभरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. भाजप ईडी आणि आयकर विभागाचा गैरवापर करत आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची जबाबदारी काँग्रेसकडे आली आहे. काँग्रेसच्या विचारधारेमध्ये आणि धोरणांमध्ये तडजोड न करण्याचे सोनिया गांधींनी सांगितले आहे, असे गहलोत म्हणाले.
काँग्रेसच्या आमदारांना जयपूर येथील विस्ता रिसॉर्टवर ठेवण्यात आले आहे. यांच्या देखरेखीसाठी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह इतर अनेक नेते सोबत आहेत. राजस्थानमधील अनेक काँग्रेसच्या नेत्यांचा यासाठी कडा पहारा ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात येते आहे. जयपूर येथे काँग्रेसच्या आमदारांसोबत राज्य प्रभारी मल्लीकार्जून खरगे ठाण मांडून बसले आहेत.