जयपूर - राजस्थान सरकारने कोरोना चाचणी घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवला आहे. चाचणी घेताना अचूकता येत नसल्याने या किटचा वापर थांबविण्यात आला आहे. चाचणी घेताना 90 टक्के अचूकता येण्याची आवश्यकता असताना फक्त 5.4 टक्केच अचूकता येत आहे, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
चाचणी घेताना 90 टक्के अचूकता येण्याची आवश्यकता असताना फक्त 5.4 टक्केच अचूकता येत आहे. हे प्रमाण शून्यच्या एकदम जवळचे आहे. अचूकता कमी असल्यामुळे हे किट वापरणार नसल्याचे आम्ही आयसीएमआरला पत्र लिहून कळविले आहे. आयसीएमआरच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असे राज्याचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयातील डॉक्टारांनी सर्वात प्रथम रॅपिड टेस्टिंग किटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 1 हजार 232 नागरिकांची या किटद्वारे चाचणी घेण्यात आली तेव्हा फक्त दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र, नंतर पॉलिमर चैन रिअॅक्शन किटद्वारे चाचणी करण्यात आली, तेव्हा या संशयितांमधील अनेक जण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे रॅपीड टेस्टिंग किटचा वापर न करण्याचा राजस्थानने निर्णय घेतला.