जयपूर -राजस्थानात उद्या(शुक्रवार) विधीमंडळाचे सत्र सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यामध्ये वाद सुरू होता. आज सत्ताधारी काँग्रेस विधिमंडळ नेत्यांची बैठक गेहलोत यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला सचिन पायलटही उपस्थित होते. दरम्यान, उद्या सभागृहात काँग्रेस सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे.
अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या प्रस्तावावर आमदारांच्या सह्याही घेण्यात आल्या आहेत, असे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्षांतर्गत सुरु असलेला वाद निवळत असल्याचे दिसून येत आहे. सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी सरकार विरोधात बंडाचा झेंडा उभारला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने लक्ष घातल्याने हा वाद मिटण्याच्या मार्गावर आहे. सचिन पायलट यांनी गेहलोत यांची निवास्थानी भेट घेतली.