राजस्थान - गुजरातमधील काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने राहिलेल्या २२ आमदारांना राजस्थान येथे हलवण्यात आले आहे. २२ आमदारांना अबु रोडवरील वाईल्ड विन्डस् रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या प्रकाराचा राजस्थानमधील भाजप नेत्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे.
नगरपालिका सभापती सुरेश सिंदल, ओबीसी मार्चाचे जिल्हाध्यक्ष मनिष मोरवाल आणि स्थानिक भाजप नेत्यांनी काँग्रेसचा निषेध व्यक्त करत रिसॉर्ट मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट सुरू न ठेवण्याचे आदेश आहेत, असे असतानाही रिसॉर्ट मालकाने आमदारांना ठेवलेच कसे, असा प्रश्न सिंदल यांनी उपस्थित केला आहे. सध्या रिसॉर्टमध्ये २२ आमदारांसह एकूण काँग्रेसचे एकूण ३० जण राहत आहेत. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश पुनिया यांना देखील माहिती देण्यात आली आहे, असे सिंदल म्हणाले.