नवी दिल्ली- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यांनी आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांची भेट घेतली. देशातील लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील असलेला विश्वास अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे लेखी निवेदन त्यांनी आयोगाला दिले आहे.
निवेदनात राज ठाकरे म्हणाले की, लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कमी होऊ लागला आहे. अनेक लोक, संघटना यांनी माझ्याकडे त्यांची अस्वस्थता सांगितली. गेल्या काही निवडणुका ज्याप्रकारे हाताळल्या त्यावर लोक समाधानी नाहीत. ईव्हीएम विषयी लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. लोकसभा निवडणुकीत देशातील ३७३ मतदारसंघात (६९ टक्के) झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात तफावत आढळली आहे. कोणतीही तफावत होऊ नये म्हणून आपण मशीन वापरतो मात्र, या ईव्हीएममध्ये इतकी तफावत कशी आहे? असा प्रश्न त्यांनी केला.
मतदान यंत्रातील तफावत दाखवूनही आयोगाने यावर कोणतीही कारवाई केली नाही, हे अनाकलनीय आणि चक्रावून टाकणारे आहे. तफावतीची आकडेवारी आयोगाच्या संकेतस्थळावर होती मात्र, ती अचानक काढून घेण्यात आली. ती अचानक का काढून टाकली याचे उत्तर आयोगाने अद्याप दिलेले नाही. ह्या प्रकारामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर कसा विश्वास बसेल, असा प्रश्न त्यांनी निवेदनातून विचारला आहे.