हैदराबाद :मंगळवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तेलंगणामध्ये तब्बल ३० लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. यांपैकी १९ जण हे हैदराबादमधील आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पहायला मिळाला. हैदराबादमध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.
शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिक अडकून पडले होते. नागरिकांना दिलासा देण्याकरता तेलंगणा सरकारच्या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनीही सहभाग घेतला होता. सैन्याने बंडलगौडा येथे बचाव मोहीम राबवली. तसेच, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सैन्याने सुरक्षित स्थळी हलवले. सैन्याच्या वैद्यकीय पथकाकडून जीवनावश्यक वस्तुंची मदतही अडकून पडलेल्या नागरिकांना देण्यात येत होती.
तर, तेलंगणा सरकारने केलेल्या मदतीसाठी सैन्याचे बचाव पथक कार्यरत होते. या पथकाने २२ जणांना वाचविले, तर १ हजार १६५ जणांना सुरक्षितस्थळी नेले.