नवी दिल्ली -रेल्वेमधून प्रवास केलेल्या १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. १३ मार्चला दिल्ली ते रामगुंडमपर्यंत धावलेल्या एपी संपर्क क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास केलेल्या ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मुंबई-जबलपूर मार्गावर १६ मार्चला धावलेल्या गोदान एक्सप्रेस रेल्वेच्या बी-१ डब्यातील ४ प्रवाशांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात ते दुबईहून भारतात आले होते. सर्व संबंधितांना आवश्यक कारवाई करण्यासाठी सतर्क केले आहे.
शिवाय बंगळुरू ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आज दोन कोरोना बाधित आढळल्याने त्यांना तत्काळ कोचमधून बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आले असून डब्याची स्वच्छता करण्यात आली. या प्रकारच्या घटना रेल्वेत आढळून येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमी आवश्यकता नसल्यास प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवास न करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून केली आहे. सुरक्षित रहा आणि इतरांना सुरक्षित ठेवा. अत्यावश्यक काम असेल तरच प्रवास करावा, अन्यथा प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.